नेट/सेट म्हणजे काय? - - TopicsExpress



          

नेट/सेट म्हणजे काय? - विद्यापीठ अनुदान आयोगाने वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठांमधील प्राध्यापक व्याख्याते यांना चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना या पदावर होणाऱ्या नवीन नियुक्तीकरिता आवश्यक किमान पात्रतेबरोबरच आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अट घातली. दरवर्षी वर्षांतून दोन वेळा विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), बिगर विज्ञान विषयांसाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (National Eligibility Test-NET) आयोजन करते. पूर्वी या परीक्षेचे नाव राष्ट्रीय शैक्षणिक परीक्षा (National Education Test-NET) असे होते, पण नंतर ते बदलून राष्ट्रीय पात्रता परीक्षा असे करण्यात आले. विज्ञान विषयांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ (CSIR) हे दोन्ही संयुक्तरीत्या परीक्षेचे आयोजन करतात. पहिली नेट परीक्षा ही १९८९ साली घेण्यात आली. तेव्हापासून सातत्याने आयोगाद्वारे या परीक्षा घेण्यात येतात. उमेदवारांच्या वाढत्या संख्येचा विचार करून व ‘यूजीसी’च्या परीक्षेवरील ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतच्या मातृभाषेत / राज्यभाषेत परीक्षा देता यावी, म्हणून राज्यस्तरीय पात्रता परीक्षा घेण्याचा पर्याय सुरू करण्यात आला. १९९० मध्ये यूजीसीने यू-कॅट ((UGC Committe on Accreditation of Test-U-CAT)) ची स्थापना केली. या समितीच्या शिफारशीनुसार राज्यस्तरीय परीक्षा ही राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या धर्तीवर असेल. राज्य सरकार ही परीक्षा घेण्यासाठी योग्य विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेची नियुक्ती करते. सेट परीक्षा घेणाऱ्या राज्यांच्या कार्याची पाहणी आयोगाच्या अधिस्वीकृती समिती (Accreditation Committe) तर्फे वेळोवेळी केली जाते. त्या समितीच्या अहवालावर आधारित अंतिम निर्णय आयोगाद्वारे घेतला जातो. महाराष्ट्रामध्ये १९९४ साली पुणे विद्यापीठाला राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (SET) आयोजन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले. त्यानुसार १९९५ पासून सातत्याने पुणे विद्यापीठ सेट परीक्षेचे आयोजन करीत आहे. परीक्षेचा हेतू - परीक्षा देणारे उमेदवार हे पदव्युत्तर पातळीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असल्यामुळे त्या विषयातील पारंगत असतात. परंतु परिणामकारक शिक्षण कार्य करण्यासाठी त्यांची बौद्धिक क्षमता योग्य आहे का नाही, याचा शोध घेण्यासाठी आयोग ही परीक्षा घेते. या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराचे विषयज्ञान व सर्वसामान्य बौद्धिक क्षमतेची चाचणी घेतली जाते. नेट परीक्षेत पात्र व यशस्वी उमेदवारांपैकी काहींना शिष्यवृत्ती दिली जाते आणि इतरांना प्राध्यापकपदाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र दिले जाते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले उमेदवारसुद्धा व्याख्याता म्हणून कार्य करू शकतात, परंतु अशा परिस्थितीत त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकत नाही. सेट परीक्षेत मात्र शिष्यवृत्तीसाठी कोणतीही तरतूद नाही. किमान पात्रता - नेट / सेट परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण झाले असेल त्याच विषयाची परीक्षा देता येते. उदा. जर विद्यार्थी एम.कॉम. असेल तर तो कॉमर्स या विषयाची परीक्षा देऊ शकतो. पदव्युत्तर शिक्षणाच्या द्वितीय वर्गात शिकणारेसुद्धा परीक्षा देऊ शकतात, पण जर ते ही परीक्षा उत्तीर्ण झाले तर मात्र त्याचे प्रमाणपत्र त्यांना लगेच मिळत नाही. पदव्युत्तर परीक्षेच्या निकालाची प्रत जमा केल्यानंतरच नेट / सेट उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळते. अशा विद्यार्थ्यांनी नेट परीक्षेचा निकाल लागल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीत पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचा नेट परीक्षेचा निकाल रद्द होऊ शकतो. पदव्युत्तर परीक्षेत दोन्ही वर्षांच्या गुणांची बेरीच ही किमान ५५ टक्के (ग्रेस किंवा राऊडिंग ऑफ न होता) असेल तर तो उमेदवार परीक्षेस पात्र ठरतो. राखीव प्रवर्गातील व अपंग उमेदवारांसाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. परीक्षेतून सवलत - २७ फेब्रुवारी १९८९ पूर्वी नियुक्त झालेले, २७ फेब्रुवारी १९८९ ते १ मार्च १९९० या काळात नियुक्त झालेले आणि शासकीय ठराव २७ फेब्रुवारी ८९ मध्ये दिलेली शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे, ३१ डिसेंबर १९९३ पूर्वी एम. फिल. उत्तीर्ण असणारे, विद्यापीठ अनुदान आयोग (पीएच.डी. पदवीकरिता किमान दर्जा व प्रक्रिया) अधिनियम २००९ नुसार पीएच.डी. पदवी प्राप्त व्यक्ती, महाविद्यालय व विद्यापीठामध्ये अधिव्याख्याता म्हणून नियुक्तीकरिता नेट/सेट अनिवार्य आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिव्याख्याता पदासाठी या परीक्षेशिवाय गत्यंतर नाही. वयोमर्यादा - नेट परीक्षेतील कनिष्ठ शोध शिष्यवृत्तीसाठी (JRF) उमेदवाराचे वय २८ पेक्षा जास्त असता कामा नये. एस.सी./ एस.टी./ ओबीसी/ अपंग प्रवर्गातील व्यक्ती व स्त्रियांकरिता यामध्ये पाच वर्षांची सूट दिली आहे. या शिवाय उमेदवाराच्या पदव्युत्तर विषयाशी संबंधित संशोधन अनुभव असल्यास जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत सूट देता येते. एलएल.एम. पदवीधारकांना तीन वर्षांची सूट आहे. तथापि, कोणत्याही परिस्थितीत एकूण सूट पाच वर्षांपेक्षा अधिक असणार नाही. नेट/सेट परीक्षेतील प्राध्यापकासाठी पात्रता परीक्षेस कुठलीही वयोमर्यादा नाही. उमेदवार कोणत्याही वय वर्षांपर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. परीक्षेचे विषय - उमेदवाराने ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे त्याच विषयाची परीक्षा त्याला देता येते. तथापि, एखाद्या पदव्युत्तर पदवीच्या विषयात सेट परीक्षा घेतली जात नसेल तर त्या विषयाशी संबंधित इतर विषयाची परीक्षा देता येते. भूगोलामध्ये लोकसंख्या अभ्यास विषयासह अथवा गणित / सांख्यिकी विषयाचे विद्यार्थी लोकसंख्या अभ्यास या स्वतंत्र विषयाची परीक्षा देऊ शकतात. परीक्षा केंद्र - महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या ठिकाणी सेट परीक्षेची केंद्रे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नांदेड, अमरावती, सोलापूर व चंद्रपूर अशी महाराष्ट्रातील ११ परीक्षा केंद्रे व गोव्यातील एक मिळून १२ परीक्षा केंद्रांतून ही परीक्षा देता येते. महाराष्ट्रात नेट परीक्षेची मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद अशी चार केंद्रे आहेत. परीक्षेचे माध्यम - सेट ही परीक्षा इंग्रजी किंवा मराठी या दोन माध्यमातून देता येते तर नेट ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी या दोन माध्यमांतून देता येते. परीक्षेचे स्वरूप - सेट व नेट परीक्षेचा अभ्यासक्रम समान आहे. फरक इतकाच आहे की, सेट ही राज्यस्तरीय तर नेट ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा आहे. महाराष्ट्राच्या सेट परीक्षेची मान्यता आता फक्त महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांपुरतीच मर्यादित आहे. २४ फेब्रुवारी २००२ किंवा त्यापूर्वीच्या सेट परीक्षेला हा निर्णय लागू नाही. या पूर्वीच्या सेट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी देशभर सेवेस पात्र आहेत. राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यातसुद्धा त्यांच्या सेट परीक्षा घेतल्या जातात. पण या राज्यांतील सेट उत्तीर्ण विद्यार्थी महाराष्ट्रात सेवेसाठी पात्र धरले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी इतर राज्यांत सेवेसाठी पात्र ठरणार नाहीत. दुसरा फरक म्हणजे नेटप्रमाणे सेट परीक्षेमध्ये कनिष्ठ शोध शिष्यवृत्ती (जेआरएफ)ची तरतूद नाही. सर्व देशभर एकाच दिवशी घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेत व सर्व महाराष्ट्रात एकाच दिवशी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेत तीन प्रश्नपत्रिका असतात. या परीक्षेत उत्तर चूक असल्यास त्यासाठी गुण वजा करण्याची पद्धत (निगेटिव्ह मार्किंग) नाही. प्रश्नपत्रिका-१ ही प्रश्नपत्रिका सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य असते. यामध्ये अध्यापन व संशोधनविषयक अभियोग्यता, भाषाकौशल्य, बौद्धिक चाचण्या वगैरेंवर आधारित ५० अनिवार्य वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात, पण डिसेंबर २००९ पासून या प्रश्नपत्रिकेत ६० प्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोणतेही ५० प्रश्न सोडवावे लागतात. उमेदवाराने ५० पेक्षा अधिक प्रश्न सोडविल्यास पहिले ५० प्रश्न तपासले जातात. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात. त्यातून एक अचूक पर्याय निवडायचा असतो. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असल्याने एकूण १०० गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. प्रश्नपत्रिका-२ ही प्रश्नपत्रिका उमेदवाराने निवडलेल्या ऐच्छिक विषयाशी संबधित असते. यामध्येसुद्धा वरीलप्रमाणेच चार पर्याय, ५० अनिवार्य प्रश्न आणि १०० गुण असतात. प्रश्नपत्रिका-३ ही प्रश्नपत्रिकासुद्धा उमेदवाराने निवडलेल्या ऐच्छिक विषयांशी संबंधित असते. या प्रश्नपत्रिकेत ७५ अनिवार्य प्रश्न प्रत्येकी २ गुणांसाठी असतात. एकूण १५० गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. केवळ विज्ञान विषयाच्या नेट परीक्षेसाठी जून-२०११ पासून नवीन परीक्षापद्धती स्वीकारली आहे. त्यामध्ये केवळ एक बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यामध्ये भाग-अ सर्व विषयांसाठी समान (सामान्य विज्ञान व संशोधन अधिक्षमता) असेल. भाग-ब व भाग-क संबंधित विषयाचा असेल. त्याच्या सविस्तर माहितीसाठी ‘सीएसआयआर’चे संकेतस्थळ पाहावे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान पात्रता तीनही विषयांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाच्या मदतीने केली जाते. या तीनही पेपरमध्ये स्वतंत्रपणे किमान गुण मिळविणाऱ्यांनाच उत्तीर्ण घोषित केले जाते. पूर्वी पेपर-३ मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे किमान गुण हे एका समितीद्वारे ठरवले जात होते. दरवेळी त्यात बदल होत होता. जून-२०१२ पासून परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खालीलप्रमाणे निकष ठरवण्यात आले आहेत. यावर आधारित निकाल जाहीर केला जातो. मात्र ऐनवेळी या निकषामध्ये बदल करण्याचा अधिकार यूजीसीने राखून ठेवला आहे. उदा. जून-२०१२ च्या परीक्षेकरता तिन्ही पेपर मिळून साधारण प्रवर्गासाठी ६५ टक्के, ओबीसीकरिता ६० टक्के व एससी/ एसटी/ अपंगाकरिता ५५ टक्के पात्रता निकष ठेवले होते. आतापर्यंतच्या परीक्षेच्या निकालावरून असा अनुमान काढता येतो की, या परीक्षेचा निकाल हा साधारणत चार टक्क्य़ांच्या जवळपास लागतो. १. अध्यापन अभियोग्यता /अभिक्षमता उमेदवारांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाची चाचणी घेणे, हा या पात्रता परीक्षेचा मुख्य उद्देश आहे. उमेदवाराचा शिक्षणविषयक दृष्टिकोन कसा आहे, तो अध्ययन-अध्यापनास उपयुक्त आहे का, तो प्राध्यापदाकरिता पात्र आहे का, प्रचलित शिक्षणपद्धतीची व शिक्षणक्षेत्रातील बदलाची त्याला कितपत माहिती आहे, यासारख्या प्रश्नांमधून तपासले जाते. या विभागात सरावासाठी ५०० पेक्षा अधिक प्रश्न देण्यात आले आहेत. २. संशोधनविषयक अभियोग्यता / अभिक्षमता आजचा शिक्षक हा उद्याचा संशोधक असतो. ज्ञानदान करताना शिक्षकाला स्वतच्या ज्ञानकक्षा विस्तृत करायच्या असतात. जुने सिद्धांत चिकित्सकवृत्तीने पडताळून पाहणे, नवीन सिद्धांतांची निर्मिती करणे, विशिष्ट समस्येचा सखोल अभ्यास करून तिचे निराकरण करणे, ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता असते. म्हणून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांस संशोधन क्षेत्राविषयी मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. ३. उतारे व त्यावर आधारित प्रश्न हा विभाग विद्यार्थ्यांच्या वाचनक्षमतेच्या आकलनावर आधारित आहे. परीक्षेमध्ये एक उतारा दिलेला असतो. त्या उताऱ्यावर आधारित पाच प्रश्न दिलेले असतात. उताऱ्यांचे काळजीपूर्वक वाचन करून नंतर त्यावर आधारित प्रश्न सोडवावेत. या विभागात आम्ही १५ इंग्रजी व १६ मराठी उतारे सरावासाठी दिले आहेत. परीक्षेत हेच उतारे येतील असे नसले तरी सरावासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतात. एकदा उताऱ्यामागील तंत्र जमले की, हा विभाग खूप सोपा वाटतो व त्यावरील गुण मिळू शकतात. ४. संदेशवहन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये संदेशवहनाला खूप महत्त्व आहे. उत्तम शिक्षक होण्यासाठी संबंधित विषयातील ज्ञान महत्त्वाचे आहेच, पण ते ज्ञान इतरांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्यासाठी प्रभावी संदेशवहनाची आवश्यकता असते. म्हणून शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यास संदेशवहनाबाबत, त्याच्या प्रकाराबाबत, प्रभावी संदेशवहनाच्या पद्धतीबाबत माहिती असणे आवश्यक आहे. ५. अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद परीक्षेच्या दृष्टीने हा विभाग सर्वाधिक महत्त्वाचा असून तो मानसिक क्षमता चाचण्यांचा आहे. या विभागात एकूण १२ प्रकरणांचा समावेश केला आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना हा विभाग अवघड जातो. कारण त्यांना उदाहरणे सोडविण्याचे तंत्र माहिती नसते. एकदा हे तंत्र माहिती झाले व त्याचा पुरेसा सराव केला तर ही उदाहरणे चुटकीसरशी सोडवता येतात. ६. आकडेवारी विश्लेषण व आलेखवाचन हा विभाग आकडेवारी विश्लेषण व आलेखवाचनाचा आहे. या विभागाची मांडणी एकूण ४ प्रकरणात केली असून, त्यात तक्ता वाचन, रेखालेख वाचन, दंडाकृती स्तंभवाचन व विभाजित वर्तुळवाचन यांचा समावेश केला आहे. आलेख / तक्त याच्या काळजीपूर्वक निरीक्षणाने प्रश्न सोडविता येतात. ७. माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान आजचे युग हे माहिती-संदेशवहन तंत्रज्ञानाचे युग आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गती व अचूकता महत्त्वाची असते. माहिती तंत्रज्ञानामुळे हे सहजसाध्य आहे. ई-मेल, इंटरनेट, ऑनलाईन ट्रेडिंग, ई-बँकिंग, टेलिकॉन्फरन्सिंग, कॉम्प्युटराईज्ड अकौंटिंग, व्हच्र्युअल क्लासरूम इत्यादी शब्द परवलीचे बनले आहेत. याबाबत प्रत्येक विद्यार्थ्यांला माहिती असणे अत्यावश्यक आहे. ८. जनता व पर्यावरण कोणत्याही क्षेत्राचा विकास हे प्रगतीचे लक्षण असते, पण मानवाने स्वतची प्रगती करताना स्वतच्या स्वार्थासाठी नैसर्गिक घटकांचा अर्निबध वापर, प्रचंड वृक्षतोड, प्राणिहत्या केल्यामुळे प्रदूषण वाढत चालले आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, म्हणून पर्यावरण विषयाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे. ९. उच्च शिक्षण प्रणाली देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, त्यांची कार्यपद्धती, औपचारिक व दूर शिक्षण, तांत्रिक व व्यवसायाभिमुख शिक्षण, मूल्य शिक्षण, उच्च शिक्षण क्षेत्रात होणारे बदल इत्यादींबाबत या विभागात सखोल माहिती दिलेली आहे.
Posted on: Tue, 24 Sep 2013 07:14:51 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015